पाणी हे कायम पवित्रच असते. त्याचे पावित्र्य नाकारांऱ्यांनी आपल्या बुद्धीला लागलेला गंज आधी काढायला हवा. आज 'बाटलीतील पाणी' (बिस्लरी) आणि 'नळाचे पाणी' या दोहोंची शुद्धता आपण वैज्ञानिक निकषावर घासून पाहणार आहोत.
बघा पटतंय का?
मागील धाग्यात पाण्याचे 'शिळेपण' आणि त्याचे 'खराब होणे' दोन्हीबद्दल लिहिलं आहेच. त्यामुळे पाणी नळाद्वारे येणारं असो, वा आपण विकत घेतलेल्या बाटलीतील असो दोन्ही पाणी ताजचं असतं. पण दोन्ही बाबी आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर वेगवेगळा परिणाम करतात.
◆ बाटलीतील पाणी (बाजारातून घेत असलेली एकवेळ वापरण्याजोगी बाटली इथे अपेक्षित आहे):
अनेकदा असं घडतं की शहरातून गावी जाताना (पर्यटनासाठी वैगरे) अनेक मंडळी सोबत बिस्लरीचे एकेक दोनदोन बॉक्स (एक बॉक्स: साधारण १० ते २० बाटल्या) घेऊन जातात.'गावात पाणी स्वच्छ मिळत नाही, अस्वच्छ पाण्याने आम्ही आजारी पडू' ही दिली जाणारी प्रत्यक्ष कारणे. तर 'आमचं स्टेट्स पहा!, आम्ही विकतचं पाणी पितो' हे अप्रत्यक्ष आणि मिरवण्यासाठीची कारणे. असो, पण या मंडळींना एक गोष्ट कळत नाही, की नळाच्या पाण्यापेक्षा अधिक हानिकारक बाटलीतील पाणी आहे.'बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ' येथे झालेल्या संशोधनानुसार बाटलीबंद पाणी प्यायल्यामुळे 'मूत्राशयाचा कर्करोग' होण्याची भीती असते. कारण बाटली भरताना त्यावर प्रक्रिया केली जात असते. त्यात 'ट्रायहॅलोमिथेन्स' रसायन अल्पप्रमाणात घातले जाते.यामुळे मूत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
एकच लक्षात ठेवा हिमालयातील पाणी कोणीही २० रुपयांत देणार नाही. शिवाय हिमायलातील पाणी शुद्धच असतं याचीही हमी देता येत नाही. जाहिरात बनवणे त्यांचे काम आहे आणि त्या जाहिरातींना बळी न जाणे एका सुज्ञ नागरिकाचे लक्षण.
◆ नळाचे पाणी:
'नळाचे पाणी पिणे अधिक योग्य' असे ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी त्या नळाच्या आसपासचा परिसर स्वच्छ आणि पाणी शुद्ध ही किमान अपेक्षा असते हे आपण लक्षात घ्यायला हवे.
वरील दोन्ही निकष शहरांपेक्षा गावातच अधिक कटाक्षाने पळाले जातात, असं माझं मत आहे. कारण शहरातील मंडळीप्रमाणे 'बिस्लरी' हा पर्याय गावी नसतो शिवाय तो खिशाला परवडत देखील नाही.
जेव्हा जेव्हा आपण बाजारातून एक पाण्याची बाटली घेत असतो तेव्हा तेव्हा निसर्गावर नळाच्या पाण्यापेक्षा साडेतीन हजार (३,५००)पट अधिक विपरीत परिणाम करत असतो.बाटल्यांचे प्लास्टिक बनवण्यासाठी १.७ कोटी खनिजतेलाची पिंप एकटा अमेरिका वापरतो. त्या बाटल्यांचा पुनर्वापर करायचं जरी ठरलं तरी त्यासाठी पुन्हा ऊर्जा आवश्यक आहेच. जर नळाच्या पाण्यासाठी ०.०२ डॉलर प्रतिगॅलन खर्च येत असेल तर बाटलीतील पाण्यासाठी हा खर्च ०.६२ डॉलर प्रतिगॅलन भरतो.
◆ तुम्हाला माहीत आहे का?
१) मुंबई महानगर पालिकेचे पाणी हे देशातील अव्वल दर्जाचे पाणी आहे.
२) नीती आयोगाच्या (२०१९)च्या सर्वेक्षणात विविध दहा निकषांवर पाण्याची चाचणी केली गेली. त्या सर्व चाचण्यांत एकाही निकषावर अनुत्तीर्ण न होणारी ही एकमेव पालिका आहे.
३) मध्यंतरी भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात मुसळधार पावसामुळे पाणी घुसले होते. तरी मुंबईकरांना अशुद्ध पाणी मिळाले का? नाही. कारण या प्लांटचे नावलौकिक फक्त भारतात नाही तर आशिया खंडात आहे.
तात्पर्य: बाटलीतील पाणी कधीच पिऊ नका असं मी म्हणणार नाही. ते अप्रामाणिक देखील ठरेल पण शक्यतो ते टाळण्याचाच प्रयत्न करावा. पुढच्यावेळी जेव्हा आपण बाटलीतील पाणी घेण्यासाठी जाणार आहात त्यावेळी आरोग्याचा विचार तर व्हावाच शिवाय 'बाटलीतील पर्यावरणा'चा देखील विचार व्हावा हीच अपेक्षा.
टीप: दोन्ही धागे संपूर्ण विश्लेषणांती लिहिले असून त्यासाठी मागील जवळपास वर्षभराचे 'पाणी आणि पर्यावरण' विषयावरील वृत्तपत्र, पुस्तके, संपादकीय, विशेषांक आणि इतर माध्यमातून मिळणारी माहिती संकलित केली होती.
1 Comments
अभ्यासपूर्ण👌
ReplyDelete